नवी दिल्लीत - गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री उपस्थित असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने लागलीच पंतप्रधानांचा हा आरोप फेटाळून लावला होता. देशाच्या सर्वोच्चपदावर बसून पंतप्रधान मोदी निराधार आरोप करत आहेत. चिंता आणि हताशेमधून ते असे आरोप करत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले होते.
पण आता जी माहिती समोर आलीय त्यानुसार मोदींनी केलेल्या आरोपात तथ्य असून 6 डिसेंबरला मणिशंकर अय्यर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अशी बैठक पार पडली. या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमहू कसुरी, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह तसेच पाकिस्तानातील भारतीय दूतावासात काम केलेले काही अधिकारी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपरराष्ट्रपती हमीद अन्सारीही या कार्यक्रमाल उपस्थित होते. लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी या बैठकीला उपस्थित असल्याचे मान्य केले. भारत-पाकिस्तान संबंधांशिवाय अन्य कुठल्याही मुद्यावर चर्चा झाली नाही असे त्यांनी एका वर्तमानपत्राकडे स्पष्ट केले. 23 वे लष्करप्रमुख असलेले दीपक कपूर मार्च 2010मध्ये निवृत्त झाले. काँग्रेसने अय्यर यांच्या निवासस्थानी अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचे म्हटले होते. पण अशी बैठक झाल्याचे समोर आल्याने काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.
काय म्हणाले होते मोदीपालनपूर येथील एका सभेत बोलताना मोदींनी रविवारी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप केला. पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ काय? ते म्हणाले की, काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानी नेत्याशी चर्चा केल्याच्या एका दिवसानंतर आपल्याला ‘नीच’ म्हटले होते.
एकीकडे पाकिस्तानी सैन्याचे माजी डीजी गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे लोक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर गुजरातमधील जनता, मागास वर्ग, गरीब लोक आणि मोदी यांचा अपमान केला जात आहे. काँग्रेसने देशाच्या जनतेला हे सांगायला हवे की, काय योजना आखली जात आहे असे मोदी म्हणाले.