औरंगाबाद, दि. 16 - संविधानात कुठेही देशाच्या नावाचा उल्लेख हिंदुस्तान असा येत नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीत लाल किल्ल्यावरून केलेल्या ५५ मिनिटांच्या भाषणात अनेकदा भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा केला. त्यामुळे भारतवासियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप करीत एका वकील महिलेने सिडको पोलीस ठाण्यात पंतप्रधान मोदी यांच्या विरूद्ध तक्रार दिली आहे. औरंगाबादेतील अॅड. रमा विठ्ठलराव काळे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, संविधानाच्या कलम एक नुसार देशाचे नाव भारत म्हणजेच इंडिया असे आहे. मोदींनी १२५ कोटी लोकांना संबोधित करताना देशाचा उल्लेख हिंदुस्तान म्हणून करणे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे. पंतप्रधान मोदींचे भाषण देशातील १२५ कोटी जनतेने ऐकले. याशिवाय जगभरातील अनेकांनीही मोदींचे भाषण ऐकले. कोट्यवधी लोकांसमोर बोलताना, देशाला संबोधित करताना भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा करणे अपमानास्पद आहे. त्यामुळे देशावर प्रेम असणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा दावा काळे यांनी त्यांच्या तक्रारीत केला. पंतप्रधान म्हणून मोदी यांचे हे बेजबाबदार विधान आहे. हे संविधानाचे कलम १ चे उल्लंघन आहे. त्यामुळे पंतप्रधानाविरूद्ध देशद्रोह तथा इतर योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशभर घेतलेल्या जाहिर सभामधून देशाबाहेर गेलेले काळेधन आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५लाख रुपये जमा करील , असे अमिश दाखविले व जनतेची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची प्रत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविली आहे.
मोदी यांनी संविधानाचा अवमान केल्याची वकील महिलेची तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:43 PM