नवी दिल्ली : माजी संरक्षणमंत्री व आताचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात काय घडले याचे सत्य माहीत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घाबरतात, असा आरोप करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी राफेल प्रकरणावरून मोदींवर धारदार हल्ला चढविला.युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींना पर्रीकरांची भीती वाटते. ते पर्रीकरांविरुद्ध काहीही बोलू शकत नाहीत. याचे एकच कारण आहे व ते म्हणजे राफेल. त्यांनी दावा केला की, राफेल व्यवहाराची संपूर्ण फाईल आपल्याकडे कपाटात ठेवलेली आहे व त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून आपल्याला कोणीही काढू शकत नाही, असे स्वत: पर्रीकर यांनीच गोवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले होते. ते म्हणाले की, आम्ही राफेलच्या संबंधी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांना तीन-चार प्रश्न विचारले. पण मोदी त्याची उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांनी बरीच टोलवाटोलवी केली. पण आमच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देण्याची त्यांची हिंमत नाही.गांधी यांनी आरोप केला की, राफेल व्यवहाराची चौकशी करण्याचा सीबीआयने प्रयत्न केला तेव्हा मोदींनी अमित शहांना सीबीआयला रोखण्यास सांगितले आणि सीबीआय संचालकांची मध्यरात्री उचलबांगडी केली गेली. त्यांनी दावा केला की, राफेलचा व्यवहार करताना मोदींनी हवाईदल प्रमुखांनाही दूर ठेवले. ज्यांनी वाटाघाटी करून राफेलची किंमत प्रत्येकी ५७६ कोटी एवढी कमी करून घेतली होती त्यांचेही मोदींनी ऐकले नाही. हे सर्व करून अनिल अंबानींना फायदा व्हावा यासाठी मोदींनी अधिक महागडा सौदा केला.मोदींची झोप उडालीराफेल व्यवहारात मोदींनी भारतीय हवाईदल विकून टाकले आहे व यावरून मनाला बोचणी लागली असल्याने मोदींना रात्री झोप येत नाही, अशी टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजी मै समझ रहा हूँ की रातको आपके निंद नही आ रही है. मै जानता हूँ जब सोते है रात को तो आपको अनिल अंबानी की फोटो नजर आती है, राफेल हवाई जहाज की फोटो दिखाई दे रही है. वायूसेना की शहिदोंकी फोटा दिखाई दे रही है.
राफेलचे बिंग फुटेल म्हणून मोदी पर्रीकरांना घाबरतात; राहुल गांधींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 4:25 AM