ऑानलाइन लोकमत
पाटणा, दि. २३ - बिहारच्या मंत्रीमंडळात समाविष्ट असलेले लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना शब्दोच्चार चुकवल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून होणा-या टीकेला खुद्द लालूप्रसाद यादव यांनी प्रत्युत्तर देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केले. पंतप्रधानपदाची शपथ घेताना नरेंद्र मोदींनीही चूक केल्याचे सांगत त्यांनी पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी लालू यांनी केली. ' देशाचे विभाजन करण्याचा त्यांचा अजेंडा आहे. कारण पंतप्रधानांनी अक्षुण्ण (अतूट) शब्दाचा चुकीचा उच्चार केला' असे लालूंनी ट्विटरवर म्हटले आहे.
शुक्रवारी बिहार मंत्रीमंडलाचा शपथविधी पार पडला, त्यावेळी तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना 'अपेक्षित' ऐवजी 'उपेक्षित' असा चुकीचा शब्दोच्चार केल्याने राज्यपालांनी त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. त्यावरून विरोधकांनी तेजप्रताप यांच्यावर टीकास्त्र सोडले. मात्र लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मुलाच्या टीकाकारांना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले. ' गेल्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेताना मोदींनी अक्षुण्णचा उच्चार चुकीचा करत 'अक्षण्ण' असे म्हटल्याचे सांगत लालूंनी मोदींच्या शपथविधीचा व्हिडीओ शेअर केला. पंतप्रधानांनी एकता व अखंडता अबाधित राखण्याची शपथ घेतलीच नाही, अक्षुण्ण शब्दाचा नीट उच्चार न करणा-या मोदींनी पुन्हा शपथ घ्यावी' असे लालूंनी म्हटले आहे.