नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली. याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी (2 मे रोजी) होईल. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाला काही निर्णय घ्यायचा असल्यास, आयोगाला तशी परवानगी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आयोगाच्या भूमिकेकडे याचिकाकर्त्याचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. काँग्रेस पक्षातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली असून मोदी अन् शहांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोन दिग्गज नेत्यांकडून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे या 146 पानांच्या याचिकेत म्हटले आहे. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी केली.
सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या खंडपीठात ही सुनावणी झाली. देव यांचे ज्येष्ठ वकील, अभिषेक मनु संघवी यांनी दाखल केलेल्या याचिकेतून मोदी आणि अमित शहांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण आयोगाकडून कुठलिही कारवाई होत नसल्याचे याचिकेत म्हटले. गेल्या 4 आठवड्यांपासून देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, मोदी आणि शाह द्वेषपूर्ण विधाने करत आहेत. आपल्या भाषणात सैन्यातील जवानांचा वापर करत आचारसंहिता भंग करत आहेत. निवडणूक आयोगाला अशी 40 प्रकरणे लक्षात आणून दिली, तरीही आयोगाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे या याचिकेत म्हटले आहे.