ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, १० - आम आदमी पक्षाने दिल्लीतील सत्तास्थापनेवरुन भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले असतानाच आपचे नेते कुमार विश्वास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. कुमार विश्वास यांच्या या विरोधाभासी भूमिकेमुळे ते आपला सोडचिठ्ठी देतात का याविषयी चर्चा रंगली आहे.एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीमध्ये कुमार विश्वास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली. जम्मू-काश्मीरमध्ये पूर आल्यावर नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यामुळे तेथील जनतेला भारताचा पंतप्रधान 'आपला' वाटू लागल्याचे कुमार विश्वास यांनी सांगितले. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान असल्याचे त्यांनी नमूद केले. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये होणा-या कवीसंमेलनात बोलवणे आले असून एक कवी म्हणून या संमेलनात सहभागी होण्यात काहीच गैर नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने मला याकार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देईन असा इशाराच त्यांनी दिला आहे. देशात काँग्रेसचे उच्चाटन होणे गरजेचे असून भाजप आणि आप हे दोनच पक्ष असायला हवेत असेही त्यांनी सांगितले.नरेंद्र मोदींची स्तुती करतानाच अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांनी टीका केली. विश्वास म्हणाले, केजरीवाल हे हट्टी स्वभावाचे आहेत. दिल्लीतील सरकार सोडताना आपने जनतेचे विचार जाणून घेतले नाही. वारंवार धरणे आंदोलन करणे योग्य नाही असा टोलाही त्यांनी स्वपक्षातील नेत्यांना लगावला.
मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदीच चांगले - कुमार विश्वास
By admin | Published: September 10, 2014 6:26 AM