नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमार्फत देशातील सर्व शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. मोदी सरकार-2 स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदा कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आधी फक्त देशातील लहान शेतकऱ्यांसाठी लागू होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्तेत पुन्हा आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे हे आश्वासन आपल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पूर्ण केले आहे. या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे देशातील जवळपास 14.5 कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याची नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पैसा वितरीत करण्यात आला आहे. आतापर्यंत 12.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. फक्त 2 कोटी शेतकरी या लाभापासून वंचित होते. आता या सर्व शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेवर आधी 75 हजार कोटी रुपये खर्च होत होता, आता त्यावर 12 हजार कोटी अधिक खर्च वाढेल. म्हणजे आता हा एकूण खर्च 87 हजार कोटी एवढा होणार आहे, असे नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.
शेतकरी आणि लघू उद्योजकांसाठी पेन्शन योजनाशेतकरी आणि लघू उद्योजकांसाठी पेन्शन योजनाही घोषित केली. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष वयाच्या शेतकरी आणि लघू उद्योजकांना वयाच्या 60 व्या वर्षी दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. या योजनेअंतर्गत 10 हजार कोटींचा खर्च येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला दर महिन्याला केवळ 55 रुपये भरावे लागणार आहे. सरकारही तेवढेच पैसे त्याच्या खात्यात जमा करणार आहे. या योजनेचा 12 ते 13 कोटी लोकांना लाभ होईल, असे नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या निर्यणाशिवाय या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी शहिदांच्या मुलांना मिळणाऱ्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नॅशनल डिफेन्स फंडाद्वारे येणाऱ्या 'पंतप्रधान स्कॉलररशीप योजने'त मोठे फेरबदल करण्यात आले असून दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मुलांची स्कॉलरशीप दरमहा 2 हजार रुपयांवरून 2500 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, मुलींची स्कॉलरशीप 2250 रुपयांवरून 3000 रुपये करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा काल शपथविधी पार पडला. यानंतर आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आल्यानंतर मोदी सरकार-2 ची पहिली कॅबिनेट बैठक संध्याकाळी पार पडली. या बैठकीच्या आधी पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.