ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 19 - केंद्रीय मंत्रिमंडळानं आज VVPAT मशिन खरेदीला हिरवा कंदील दाखवला आहे. नवीन व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) मशिन घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंतर कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. निवडणूक आयोग VVPAT मशिनचा उपयोग पुढच्या लोकसभा निवडणुकीत करणार आहे. केंद्र सरकारने या मशिन खरेदीसाठी 3,714 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच भारत या 16.15 लाख मशिन्स खरेदी करणार आहेत. VVPAT मशिन खरेदीच्या निर्णयाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत घेऊन या निर्णयाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून ईव्हीएम मशिनमधल्या बिघाडावरून सरकारला धारेवर धरत वाद निर्माण केला होता. भारतातल्या अनेक राज्यांत ईव्हीएममधील बिघाडामुळेच विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. विरोधकांच्या आरोपांची गांभीर्यानं दखल घेत मंत्रिमंडळाने व्हीव्हीपीएटी मशिन घेण्यास आता परवानगी दिली आहे. मतदाराला मतदान केल्यावर मत दिल्याचीही पावतीही प्राप्त होणार आहे. त्यामुळे मतदाराला कोणाला मत दिले हे जाणून घेता येणार आहे. या मशिनचा वापर पहिल्यांदा 1992मध्ये झाला होता. यानंतर 2013, 2015 मध्येही प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर करण्यात आल्याची माहिती जेटलींनी दिली आहे. निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे या मशिन घेण्यासाठी 3,714 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्याच प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला सुमारे 16 लाख VVPAT मशिन घेतल्या जाणार होत्या. निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे.
मोदी कॅबिनेटनं VVPAT मशिन खरेदीला दाखवला हिरवा कंदील
By admin | Published: April 19, 2017 5:45 PM