हैदराबाद - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखऱ राव यांचा पराभव करू शकत नाही, कारण तेसुद्धा कट्टर हिंदुत्ववादी आहेत, असं ओवैसी म्हणाले आहेत. एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भाजपा म्हणते तेलंगणामध्ये लवकरच सरकार स्थापन करू, पण के चंद्रशेखऱ राव सुद्धा कट्टर हिंदू आहेत. जर मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर 6 मंदिरात जातील, असंही ओवैसींनी सांगितलं आहे. केसीआर यांचा पराभव करण्यासाठी भाजपा हिंदुत्वाचं कार्ड वापरू शकत नाही. आम्ही हिंदू धर्माच्या विरोधात नाही. परंतु हिंदुत्वाच्या विरोधात आहोत. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वींवरही निशाणा साधला आहे. नक्वींनी दरवर्षी एक कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं आश्वासन दिलं होतं. मग केंद्रीय बजेटमध्ये शिष्यवृत्ती काही दिली नाही?, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.ओवैसींनी संघालाही लक्ष्य केलं आहे. इथे कथित स्वरूपात 'जय श्री राम' आणि 'वंदे मातरम' न म्हटल्यास मुस्लिमांना मारहाण केली जाते. लोकांना मारहाण केली जाते, कारण ते जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा देत नाहीत. अशा घटना आता थांबणार नाहीत. फक्त मुसलमान आणि दलितांना टार्गेट केलं जातंय. अशा घटनांच्या मागे एक गट आहे आणि तो संघ परिवाराशी निगडित आहे.राजस्थानमध्ये दोन वर्षांपूर्वी मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालेल्या पहलू खानविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. या प्रकरणावरून ओवैसी यांनी काँग्रेसलाही खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेस नेहमीच दुटप्पी भूमिका घेत असते. जेव्हा पहलू खानवर हल्ला झाला, त्यावेळी काँग्रेसनं त्याचा निषेध नोंदवला होता. अशोक गेहलोत सरकारचं हे निधेषार्ह कार्य आहे. राजस्थानच्या मुस्लिमांना काँग्रेसनं नेहमीच दगा दिला आहे. त्यामुळे मुस्लिमांनी काँग्रेसवर विश्वास ठेवू नये.
k-chandrashekar-rao-is-a-staunch-hindu-bjp-can-not-defeat-kcr-says-asaduddin-owaisi/