पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या चांद्रयान 2 कामगिरीचं कौतुक केलं आहे. 130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या कार्यालयातून चांद्रयान 2 मोहीमेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहात होते. चांद्रयान 2 झेपावताच दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा करण्याचा मोह पंतप्रधान नरेंद्र मोदीही आवरू शकले नाहीत.
जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. गेल्या रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, आज हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले आहे. चांद्रयान 2 झेपावताच काही वेळानंतर इस्रोतील शास्त्रज्ञांनी एकमेकांचे हस्तांदोलन करुन आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. ‘चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण झाले. ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच इस्रोतील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले आहे.
''चांद्रयान 2 मोहीम देशातील कोट्यवधी तरुणांना प्रेरणा देणारी आहे. तरुणांचा विज्ञानकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी आणि उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनाची आवड निर्माण करणारी ही प्रयत्नशील मोहीम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रवावरील विवरांमध्ये अभ्यास आणि संशोधनाचे काम चांद्रयान 2 द्वारे होत आहे. त्यामुळे ही मोहीत युनिक असल्याचंही पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे. या मोहिमेतून चंद्राबद्दलची नवीन माहिती जगासमोर येईल. यापूर्वी अशी मोहीम कधीही झाली नसल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. चांद्रयान 2 ही मोहीम देशातील प्रत्येकाला अत्यानंद देणार आहे.''
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्विट करुन इस्रोच्या वैज्ञानिकांना सॅल्यूट केला आहे. तसेच, चांद्रयान 2 च्या मोहिमेच्या पुढील यशस्वीतेसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.