'पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यासारखे दिसतात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 08:43 AM2019-03-10T08:43:40+5:302019-03-10T09:03:59+5:30
काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयाशांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. विजयाशांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात. देशाला त्यांची भीती वाटते असं म्हटलं आहे.
हैदराबाद - काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयाशांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. विजयाशांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात. देशाला त्यांची भीती वाटते तसेच सगळ्या जनतेला ते घाबरवत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. शनिवारी (9 मार्च) तेलंगणामध्येकाँग्रेसच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या दहशतवाद्यासारखे दिसतात. कधी ते आपल्यावर कोणता बॉम्ब टाकतील याची सतत भीती वाटते. त्यामुळे मोदींना सगळेच लोक घाबरतात. जनतेवर प्रेम करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला घाबरवत आहेत. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या माणसाने कसं नसावं याचं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत' असं विजयाशांती यांनी म्हटलं आहे.
Vijaya Shanti, Congress in Shamshabad, Telangana: Everyone is scared that at what moment Modi will shoot the bomb. He looks like a terrorist. Instead of loving people, he is scaring people. It's not the way how a PM should be. pic.twitter.com/1pDEvYHXH8
— ANI (@ANI) March 9, 2019
"मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय"
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आलिंगन देणारे व हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयला पठाणकोट येथे चौकशीसाठी येण्याचे आमंत्रण धाडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत, अशी घणाघाती टीका याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागणारे विरोधी पक्ष हे पाकिस्तानचे पोस्टर बॉइज असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यावर टोला लगावताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही नव्हे तर मोदीच पाकिस्तानचे पोस्टरबॉय आहेत. नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी मोदी यांनी त्यांना जाहीरपणे आलिंगन दिले होते. तसेच शरीफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कसलेली अधिकृत निमंत्रण मिळालेले नसतानाही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी पाकिस्तानात गेले होते. बालाकोटवर केलेल्या हल्ल्यामुळे नेमके काय साधले, असा सवाल पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी केला आहे, याची आठवणही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी करून दिली होती.
राफेल दस्तावेजांच्या झालेल्या चोरीबद्दल जर चौकशी करण्यात येते, तर विमाने खरेदीतील 30 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. ते म्हणाले की, राफेल व्यवहाराबाबत भारतीय शिष्टमंडळाकडून बोलणी सुरू असताना काही जणांकडून समांतर बोलणीही सुरू होती. या विमानांच्या खरेदीला पंतप्रधानांनी मुद्दामहून उशीर केला. कारण अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपयांचा फायदा करून देण्याचा मोदींचा इरादा होता. न्याय सर्वांसाठी समान असावा. मात्र केंद्र सरकार मोदी यांना वाचवत आहे.