नवी दिल्ली : ‘सबका साथ सबका विकास’ घोषणेव्दारा केंद्रातल्या मोदी सरकारने विविध धर्म, जाती आणि पंथांच्या समुदायांना सामुदायिक सौहार्दाच्या आश्वासक वातावरणाचा भरवसा दिला होता. या आश्वासनापासून केंद्रातले सरकार मात्र दूर चालले आहे असे पदोपदी जाणवते. देशात मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलित समुदायांसाठी वातावरण खूपच खराब आहे. अल्पसंख्यांकांना सरकारच्या धोरणांमधे अपेक्षित स्थान नाही, अशी चौफेर टीका जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना अशरद मदनींनी केली.मुस्लिम समुदायाची अग्रगण्य संस्था जमियत उलेमा ए हिंद ने दिल्लीत एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी मदनी बोलत होते. ‘भारतातली विद्यमान राजकीय व सामाजिक स्थिती’ हा चर्चासत्रातल्या विषयांचा केंद्रबिंदू आहे. चर्चासत्रात बोलतांना बहुतांश वक्त्यांनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. नामवंत मुस्लिम विचारवंतांसह राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार मोहम्मद सलिम आदी मान्यवर चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. चर्चासत्राला खास शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी संदेश पाठवला. गुलाम नबी आझाद यांनी चर्चासत्रात तो वाचून दाखवला. संदेशात सोनियांनी म्हंटले की ‘देशाचे मार्गक्रमण सध्या अत्यंत नाजूक कालखंडातून सुरू आहे. विविध स्तरांवर विव्देषाचे वातावरण तयार केले जात आहे. अशावेळी आपण सर्वांनी एका व्यासपीठावर येण्याची गरज आहे. जमियतने त्या दिशेने चालवलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल, अशी आशा आहे ’(विशेष प्रतिनिधी)