ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 19 - जीएसटी घाईघाईमध्ये लागू करु नका हे आम्ही सरकारला सांगत होतो. पण त्यांनी आमचे ऐकले नाही. सरकार जीएसटी लागू केल्याचा आनंद साजरा करत आहे. पण जीएसटीमध्ये अनेक त्रुटी, उणीवा आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य जनता, छोटया व्यापा-यांचे नुकसान होत आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटीच्या मुद्यावरुन नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. राजस्थानच्या बंसवाडा येथे त्यांची जाहीर सभेत बोलताना त्यांनी टीका केली.
सरकारकडून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत पण शेतक-यावर कर्जाचा बोजा आहे. मी जीएसटी लागू केला हे मोदींना जगाला दाखवायचे होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीएसटी लागू केला ते दाखवायचे होते. पण हा देश अमेरिकेचा नाही. हा देश इथल्या जनतेचा, शेतक-यांचा आहे असे राहुल गांधी म्हणाले.
आणखी वाचा
हे सरकार उद्योगपतींसाठी काम करतेय या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मोदी सरकार उद्योगपतींसाठी चालवतात, शेतकरी, छोटे व्यापारी, सर्वसामान्यांची सरकारला पर्वा नाही असा आरोप राहुलनी केला. जीएसटीची मोठया व्यापा-यांना झळ पोहोचत नाहीय, ते दहा काऊंटट नेमून फॉर्म भरु शकतात. पण छोटया व्यापा-यांचे नुकसान होते आहे असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसने पंजाब, कर्नाटकमध्ये शेतक-यांची कर्जे माफ केली, भाजपाने काँग्रेसच्या भितीने कर्जे माफ केली असा दावा राहुल गांधी यांनी केला.