संगारेड्डी - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून नेतेमंडळींनी विकासकामे आणि मेळाव्यांच्या माध्यमातून सभांचा धडाका सुरू केल्याचं दिसून येत आहे. देशात पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपा आणि मित्रपक्ष कामाला लागले आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या एका सभेत लालू प्रसाद यादव यांनी मोदींना परिवार नसल्याची टीका केली होती. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी ट्विटर प्रोफाईलवर स्वत:च्या नावापुढे मोदी का परिवार असे लिहिण्यास सुरुवात केली. आता, स्वत: नरेंद्र मोदींनी लालू प्रसाद यादव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
तेलंगणातील संगारेड्डी येथील सभेला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ''विरोधकांनी काळा पैसा जमा करण्यासाठी विदेशात बँक खाते उघडले. पण, इथं मोदी आहे, ज्याने भारतात कोट्यवधी गरिब बंधु-भगिनींचे जन-धन खाते सुरू केले. हा फरक आहे, या घराणेशाहीवाल्यांनी स्वत:साठी घरं बनवली, आपल्या कुटुंबासाठी महल बनवले, शिशमहल बनवले. पण, मोदीने आजपर्यंत स्वत:साठी एक घर बनवले नाही. याउलट मोदी देशातील गरिबांचे पक्के घर बनवत असून आत्तापर्यंत ४ कोटी घरं बांधण्यात आली आहेत.'', असे मोदींनी म्हटले.
काँग्रेसने देश बरबाद केला, तर मोदी देश उभारण्यासाठी, तुमचं भविष्य बनविण्यासाठी, तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आकाश, पाताळ, दिवस-रात्र एक करत आहे. त्यामुळेच, गोंधळलेले हे लोकं माझा परिवार नसल्याच्या गोष्टी करत आहेत. पण, ते हे विसरत आहेत की, १४० कोटी भारतीय माझा परिवार आहे. देशातील प्रत्येक माता-भगिनी मोदींचा परिवार आहे. देशातील प्रत्येक युवक, मुलं-मुली हा मोदींचा परिवार आहे. आज देशातील करोडो भारतीय मला आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात.
दरम्यान, मोदींनी तेलंगणातील जनतेलाही मोदी का परिवार म्हणायला लावले. यावेळी, त्यांनी स्वत: तेलुगू भाषेत नेने मोदी कुटुंबम.. असे म्हणत उपस्थितांनाही नेने मोदी कुटुंबम म्हणायला भाग पाडले.