शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कूटनीतीची अजिबात समज नाही. ते कूटनीतीचाही इव्हेंट मॅनेजमेंटप्रमाणेच विचार करीत असून त्यामुळेच गुरुदासपूर, पठाणकोट आणि पांपोरसारख्या दहशतवादी घटना घडत आहेत, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनी सरकारी आकडेवारी सादर करताना सांगितले की, ५० जहाल नक्षलवादी पाकिस्तानातून भारतात घुसले असताना सरकार मात्र निद्रिस्थ आहे. एकीकडे सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्यासोबत इफ्तारी साजरी करीत आहेत. पाकिस्तानबद्दल मोदी सरकारचे काय धोरण आहे तेच कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा व नवाज शरीफ यांच्या मैत्रीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकार पाकिस्तानसह ज्या पद्धतीने नाते जपत आहे आणि वेळोवेळी भारताकडून पुढाकारानंतरही हल्ल्यांची जी मालिका सुरू आहे त्यातून धडा घेण्याची गरज आहे. परंतु सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. गृहमंत्री राजनाथसिंग व परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तानबाबत वक्तव्यांचा समाचार घेताना केवळ बयाणबाजीच होत राहणार का? कारवाई केव्हा होणार? असा सवाल सिब्बल यांनी केला. भारतीय जवान कुठवर शहीद होणार याचे उत्तर पंतप्रधानांना द्यावे लागेल, असे आव्हान त्यांनी दिले. मोदींची फिरकी घेताना ते म्हणाले, हा साऊंड व लाईट शो नाही. परराष्ट्र धोरण गंभीरपणे राबवावे लागते. मोदी यांना कूटनीतीचा कुठलाही अनुभव नसल्याने ते कूटनीतीचा केवळ देखावा करीत असतात, असे काँग्रेसचे मत आहे. अणु पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यतेबाबतही मोदींची वागणूक अशीच राहिली. जगभरात ढोल पिटला आणि सेऊलमधून रिक्त हस्ते परत आले. एनएसजीवर मुत्सद्देगिरीत भारताच्या अपयशामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली असून याला पूर्णत: पंतप्रधान मोदी यांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.