नवी दिल्ली:अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) 17 वर्षीय किशोरवयीन मुलाचे अपहरण केल्याची माहिती मीडियातून समोर आली आहे. त्या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
'मोदींना पर्वा नाही...राहुल गांधी यांनी या घटनेवरील पंतप्रधान मोदींच्या मौनावर हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विट केले की, 'प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी, भारताच्या भविष्य निर्मात्याचे चीनने अपहरण केले आहे. आम्ही मीराम तरौनच्या कुटुंबासोबत आहोत आणि आशा सोडणार नाही, हार मानणार नाही. पंतप्रधानांचे मौन दर्शवते की, त्यांना पर्वा नाही!', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
अरुणाचलच्या खासदाराने केली पुष्टीभारतीय लष्कराच्या सूत्रांनी ही घटना 18 जानेवारीला घडल्याची पुष्टी केली आहे. अरुणाचल प्रदेश सरकारच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती नवी दिल्लीला देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी बुधवारी एका 17 वर्षीय तरुणाचे भारतीय हद्दीतून अपहरण केल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. गाओ यांनी सांगितल्यानुसार, अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मीरम तरौन असे आहे.
ट्विटरवरुन माहिती दिलीअरुणाचल प्रदेशात शियांग नदी भारतात प्रवेश करते त्या ठिकाणाजवळ ही घटना घडल्याचे खासदार गाओ म्हणाले. याआधी मंगळवारी गाओंनी ट्विट करुन तरुणाच्या अपहरणाची माहिती शेअर केली होती. त्यांनी ट्विटसह अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचे छायाचित्र शेअर केले आणि म्हटले की, "भारत सरकारच्या सर्व एजन्सींना विनंती आहे की त्यांनी अल्पवयीन मुलाची लवकर सुटका केली पाहिजे."