नवी दिल्ली - पुणे जिल्ह्यातील मूळशीच्या पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे असलेल्या एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून २० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. आणखी काही कामगार अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच, पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनिटायझर बनविले जात असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्र रुप धारण केले होते. स्थानिक ग्रामस्थांनीही तातडीने धाव घेतली. घटनास्थळी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार ३७ पैकी १० कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, २० कामगार अडकले होते. सायंकाळी उशिरापर्यंत २० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने कुलींग सुरू केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदती घोषित केली आहे. त्यासोबतच, घटनेच्या चौकशीचेही आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेनं अंतकरणाला वेदना होत असल्याचं मोदींनी म्हटलंय.
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत
“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
आगीच्या चौकशीचे आदेश
मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे.