नवी दिल्ली - गुजरातच्या सुरतमध्ये भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. सूरतच्या पिपलोद गावांनजीक एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 18 मजूरांना चिरडले. त्यामध्ये, 14 जणांचा मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत 14 जणांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या घनटेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही शोक व्यक्त केलाय.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, अपघाताच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केलीय.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अपघाताच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केले असून जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अपघाताची ही घटना मनाला अतिशय वेदना देणारी असून पीडित कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत, असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या सुरतमधील भीषण अपघात दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो, तर जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींना उपचारासाठी 50 हजारांची मदत देण्यात येणार आहे. पीएमओ कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.