ऑनलाइन लोकमत
माद्रिद, 31 - चार देशांच्या युरोप दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल झाले. सहा दिवसांच्या दौ-यातील हा दुसरा टप्पा आहे. मोदींनी सर्वप्रथम जर्मनीला भेट देऊन चॅन्सलेर अँजेला मर्केल यांच्यासोबत चर्चा केली. स्पेन दौ-यात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करणे तसेच स्पेनबरोबरचे आर्थिक संबंध विकसित करण्याचा उद्देश आहे. स्पेनबरोबरच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी आपण इथे आलो आहोत असे मोदींनी माद्रिदमध्ये दाखल होताच इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत टि्वट करुन सांगितले.
मोदींचा हा स्पेन दौरा एका अर्थाने ऐतिहासिकच आहे. कारण 30 वर्षांनी 1988 नंतर स्पेनला भेट देणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता. स्पेनच्या अर्थमंत्र्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी दिली.
भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या स्पॅनिश उद्योगपतींबरोबरही मोदी चर्चा करणार आहेत. स्पेनचा दौरा आटोपून मोदी 1 जूनला रशियाला जातील. मोदी 18 व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेला उपस्थित असतील. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर त्यांची चर्चा होईल. त्यानंतर 2 आणि 3 जूनला पंतप्रधान फ्रान्समध्ये असतील. तिथे ते फ्रान्सचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर चर्चा करतील.
सोमवारी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली. मर्केल यांच्याबरोबर विविध मुद्यांवर समाधानकारक चर्चा झाल्याचे मोदींनी टि्वट करुन सांगितले. चर्चा करताना दोन्ही नेत्यांनी 18 व्या शतकातील शाही महालाच्या बगीच्यामध्येही फेरफटका मारला.
जर्मनीमध्ये पोहोचल्यानंतर हँडल्सब्लाट या जर्मन वर्तमानपत्राशी बोलताना दहशतवादाला रोखण्यात युरोपची भूमिका महत्वाची असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मागच्यावर्षीय युरोपमधल्या काही देशात दहशतवादी हल्ले झाले. अगदी अलीकडे 22 मे रोजी इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला.
जर्मनी हा भारताचा युरोपमधला महत्वाचा सहकारी देश आहे. दोन्ही देशात 2016 मध्ये 17.42 अब्ज डॉलरचा व्यवहार झाला. या दौ-यात जर्मनीमधल्या छोटया आणि मध्यम उद्योग कंपन्यांना भारताच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टमध्ये जोडण्याचा मोदींचा प्रयत्न असेल. आर्थिक संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. मी या भागीदारीसाठी खूप आशावादी आहे असे मोदींनी सांगितले.