ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. २८ - पाकिस्तान आणि अमेरिका हे देश म्हणजे दहशतवादी घडवणारे कारखाने असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सबका साथ सबका विकास' हे ओबामांकडून पोपटाप्रमाणे वदवून घेतले अशी मुक्ताफळे बडोद्याचे महापौर आणि भाजपा नेते भरत शहा यांनी उधळली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसांच्या भारत दौ-यावर आले होते. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील कार्यक्रमात ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नरेंद्र मोदी आणि ओबामा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच बडोद्यातील महापौर भरत शहा यांनी मोदींची स्तुती करताना ओबामांवर आक्षेपार्ह शब्दात शेरेबाजी केली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात शहा म्हणाले, भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले. पण भारताने विकासाची वाट धरली. तर पाकने दहशतवादी घडवण्यास प्राधान्य दिले. आज अमेरिकेनेही भारताला स्वीकारले असून मोदींनी ओबामांकडून सबका साथ सबका विकास हे पोपटाप्रमाणे वदवून घेतले असेही त्यांनी नमुद केले. बडोद्यातील काँग्रेस नेते शैलेश अमीन यांनी या विधानातव नाराजी व्यक्त केली आहे. ओबामा यांना २००९ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून केंद्रातील भाजपा सरकारने ओबामांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते. अशा स्थितीत भाजपाच्या महापौरांनीच ओबामांवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणे निंदनीय आहे असे अमीन यांनी सांगितले.