नवी दिल्ली - भाजपचे प्रमुख नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाला निधी म्हणून एक हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच, भाजपच्य सर्व कार्यकर्त्यांनाही पक्षासाठी मदतनिधी देण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. भाजपचे हात बळकट करण्यासाठी आणि भारताला मजबूत बनविण्यासाठी आर्थिक स्वरुपात मदत करण्याचं आवाहनच मोदींनी केलं आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयात हा फंड जमा होणार असून मोदींनी आजच ही रक्कम जमा केली आहे.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, मात्र भाजपचे कार्यकर्ता बनून ते पक्षासाठीची जबाबदारीही पार पाडताना दिसतात. कोविड काळात भाजपाकडून नागरिकांसाठी जे शक्य ते करण्यासाठी ते भाजपा नेतृत्वाला सूचना करत होते. तर, पीएम केअर फंडाच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून देशाच्या नागरिकांसाठी सोयी-सुविधा देण्याचं काम पंतप्रधान म्हणून त्यांनी केलं. आता, भाजपचे प्रमुख नेते म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, पक्षासाठी 1 हजार रुपये त्यांनी देऊ केले आहेत. तसेच, कार्यकर्त्यांनाही पक्षनिधीसाठी आवाहन केलंय.