ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या 2022 च्या भारताचे स्वप्न देशवासियांसमोर ठेवले आहे. 2022 साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. याआधी संधी मिळालेल्या प्रत्येक सरकारने देशाच्या प्रगतीस हातभार लावला आहे. आम्ही प्रत्येकाचे योगदान मान्य करतो. मात्र 2022 च्या भारताच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सर्वांना एकजुटीने मोहीम हाती घ्यावी लागेल, असे आवाहन मोदींनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपा मुख्यालयात झालेल्या विजयोत्सवात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल पक्षाध्यक्ष अमित शहा आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले. यावेळी मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विनम्रपणे काम करून जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण कराव्यात असा सल्ला दिला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील बंपर विजयानंतर भाजपामध्ये उत्साहाचे भरते आले आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील विजयाचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले असून, त्या निमित्त मोदींचा भाजपा कार्यालयात सत्कारही करण्यात आला. हा सत्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करत 11 अशोक रो़ड येथील भाजपा मुख्यालयाकडे आले. यावेळी पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते तसेच नेत्यांनी गर्दी केली होती.
"देशात भावनिक मुद्यावरून अनेक लाटा येऊन गेल्या आहेत. भावनिक मुद्दे नसताना मोठ्या प्रमाणावर मतदान होणे, विशेष आहे. त्यामुळे या पाच राज्यातील निवडणुकांकडे मी नव्या भारताची निर्मिती होत असल्याचे संकेत म्हणून पाहत आहे. या निवडणुकीतून देशात बहुसंख्येने असलेला युवक, महिला यांच्या आकांक्षा प्रकट झाल्या आहेत." असे मोदी म्हणाले.
यावेळी भाजपाच्या बंपर यशामुळे हुरळून न जाता विनम्र राहण्याचा सल्लाही मोदींनी कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले, "जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवते, वृक्षवेलीही शिकवतात. ज्या झाडाला फळे येतात ते झाड नेहमी झुकलेले असते. भाजपाच्या विशाल वटवृक्षाला आता विजयरूपी फळे येऊ लागली आहेत. तेव्हा त्यामुळे आता आपली झुकण्याची वेळ आहे. विनम्र होण्याची वेळ आहे."
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- सरकारला भेदभाव करण्याचा हक्क नसतो आणि भाजपा असा भेदभाव करणार नाही, आमचे सरकार सर्वांचे आहे - मोदी
- या निवडणुकीत भाजपाचे अनेक नवे नेते निवडून आले आहेत, ते राजकारणात नवखे आहेत, मात्र त्यांच्याकडून जनतेला अपेक्षा आहेत. आता जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील -मोदी
- गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाला सातत्याने यश मिळत आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा, मंत्रिगण आणि लक्षावधी कार्यकर्त्यांना शुभेच्छा - मोदी
-देशातील गरिबामध्ये स्वत:चा भार उचलण्याची क्षमता आली की मध्यमवर्गावरील भार कमी होईल, दोघांची ताकद एकत्र आल्यास आपल्या देशाला जगात कुणी रोखू शकणार नाही - मोदी- मध्यमवर्ग देशातील बहुतांश भार वाहतो, त्याच्यावरील भार कमी झाला पाहिजे - मोदी
- सरकारला भेदभाव करण्याचा हक्क नसतो आणि भाजपा असा भेदभाव करणार नाही - मोदी
- 2022 साली देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनी भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम करावे लागतील - मोदी
- गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाला सातत्याने यश मिळत आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा, मंत्रिगण आणि लक्षावधी कार्यकर्त्यांना शुभेच्छा - मोदी
- भाजपाच्या वटवृक्षाला विजयरुपी फळे आली आहेत, आता विनम्र व्हा, मोदींचे नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन
-आम्ही पुढे जाऊ इच्छितोय, तुम्ही आम्हाला मदत सहकार्य करा, अशी नव्या भारताची भावना आहे - मोदी
- हा तरुणांच्या, महिलांच्या स्वप्नातील नवा भारत आहे - मोदी
- देशात भावनिक मुद्यावरून अनेक लाटा येऊन गेल्या आहेत. भावनिक मुद्दे नसताना मोठ्या प्रमाणावर मतदान होणे, यातून नव्या भारताचे निर्माण होत आहे - मोदी
- मतदानाची वाढती टक्केवारी, लोकशाहीसाठी शुभसंकेत - मोदी
- मतदारांची राष्ट्रनिर्माणातील भागीदारी वाढणे आवश्यक - मोदी
- मोदींनी देशवासियांना दिल्या होळीच्या शुभेच्छा
- भाजपा मुख्यालयात मोदींच्या भाषणास सुरुवात
#WATCH: Prime Minister Narendra Modi receives a warm welcome as he arrives at BJP HQ in Delhi, greets the crowd #ElectionResultspic.twitter.com/scZMAbe9Qv— ANI (@ANI_news) March 12, 2017