केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी, राहुल गांधींची घणाघाती टीका   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 02:59 PM2018-08-09T14:59:33+5:302018-08-09T15:00:12+5:30

दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

Modi government is anti-Dalit - Rahul Gandhi | केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी, राहुल गांधींची घणाघाती टीका   

केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी, राहुल गांधींची घणाघाती टीका   

नवी दिल्ली - दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे एससी एसटी विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार हे दलित विरोधी असल्याचे सांगितले. देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. देशात कुठेही दलित अत्याचाराविरोधात बोलावले जाईल, तिथे आपण जाऊ, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत सीताराम येचुरी हेसुद्धा उपस्थित होते. 

 जंतर मंतर येथे उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि धोरणे दलितविरोधी आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी दलितांना स्वच्छता करण्यामधून आनंद मिळतो असा दावा केला होता. जर  मोदींना दलितांचे दु:ख माहीत असते तर त्यांची धोरणे वेगळी असती." 





एससी एसटी कायदा कमकुवत करण्यासाठी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांवी केला. "ज्या न्यायाधीशांनीं एससी एसटी कायद्यात बदल करून तो कमकुवत केला, त्या व्यायाधीशांना मोठे पद दिले, भारताच्या भविष्यात दलितांना कोणतेही स्थान असू नये असे मोदींना वाटते," असा आरोप त्यांनी केला. 

यावेळी राहुल गांधी यांनी दलित संघटनांना आवाहनदेखील केले. "आपण सर्वांनी एकजूट होऊन भाजपा आणि संघाच्या विचारांना पराभूत करायचे आहे. त्यांचे विचार द्वेष पसरवणारे आहेत, तर काँग्रेस पक्ष प्रेमाने सर्वांना सोबत घेऊन चालणे जाणतो. 2019 मध्ये मोदी सरकारचा पराभव अटळ आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना पराभूत केले पाहिजे. तुम्ही देशात कुठेही आंदोलन केले तरी आम्ही तुमच्या सोबत राहू. मी तुमच्यासाठी नेहमीच उभा राहीन."असे राहुल गांधी म्हणाले. 



 

Web Title: Modi government is anti-Dalit - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.