नवी दिल्ली : देशात 5G सेवा सुरू झाली आहे. या 5G सेवेबाबत सरकार अॅक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून आहे. मोबाईल कंपन्यांना निर्देश देताना सरकारने सांगितले की, 5G सेवा लवकरात लवकर मोबाईल डिव्हाइसपर्यंत पोहोचली पाहिजे. सरकारने मोबाईल निर्मात्यांना 5G सेवांसाठी मोबाईल फोनसाठी सॉफ्टवेअर अपडेट्सची गती वाढवण्यास सांगितले आहे. तसेच, सरकारने लवकरच OTA (ओव्हर द एअर) अपडेट सुरू करण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे, टेलिकॉम कंपन्यांसोबत काम सुरू असल्याचे मोबाईल निर्मात्यांनी सांगितले आहे. तसेच, त्यांनी नोव्हेंबरपर्यंत सर्व 5G इनेबल्ड फोनवर 5G आणण्यासाठी वेळ मागितला आहे. प्रत्येक कंपनीच्या मोबाईल युजर्सना लवकरात लवकर 5G सेवा मिळावा अशी सरकारची इच्छा आहे. 1 ऑक्टोबर रोजी देशात 5G लाँच झाल्यानंतर 5G सेवा अनेक मोबाइल डिव्हाइसमध्ये काम करत नव्हती.
यासंदर्भात आज दूरसंचार विभाग (DOT) ने सर्व मोबाइल फोन निर्मात्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव (एमईआयटी) उपस्थित होते. या बैठकीत, सरकारने 30 हून अधिक सहभागींना आमंत्रित केले होते, ज्यात फोन निर्माते, चिप निर्माते, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा प्रदाते आणि अनेक उद्योग संघटनांचा समावेश होता.
सध्या मोबाईल फोन 5G असूनही ग्राहकांना सेवेचा लाभ घेता आला नाही, त्यामुळे लवकरच अपडेट येईल. आयफोनवरही ग्राहकांना 5G सेवेचा लाभ मिळत नाही. तसेच, अनेक सॅमसंग फोनवर 5G सॉफ्टवेअर अपडेट नाही. सध्या फक्त 9 फोनवर 5G अपडेट देण्यात आले आहे. वन प्लस यूजर्स देखील अपडेटची वाट पाहत आहेत. मात्र, Xiaomi, Vivo, Realme, Oppo ने एअरटेसाठी अपडेट जारी केले आहेत.
आयफोनसाठी 5G अपडेटबाबत अॅपल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही भारतातील आमच्या कॅरिअर पार्टनर्ससोबत काम करत आहोत. नेटवर्क टेस्टिंग आणि परिक्षण पूर्ण होताच आयफोन युजर्सना 5G चा अनुभव मिळेल. 5G सॉफ्टवेअर अपडेटद्वारे सक्षम केले जाईल आणि डिसेंबरपर्यंत आयफोन युजर्ससाठी रोलआउट सुरू होईल.