नवी दिल्ली: मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सोमवारी संध्याकाळी मोठे फेरबदल करण्यात आले. या फेरबदलांमध्ये स्मृती इराणींना मोठा झटका बसला असून पीयूष गोयल यांना केंद्रीय अर्थमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. स्मृती इराणी यांच्याकडून माहिती व प्रसारण खात्याची सूत्रे काढून ती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता स्मृती इराणींकडे आता केवळ वस्त्रोद्योग हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते उरले आहे. तर दुसरीकडे अरूण जेटली यांच्यावर किडनीरोपण शस्त्रक्रिया झाल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या अशा अर्थखात्याचा कारभार पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या पीयषू गोयल यांच्याकडे रेल्वेमंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. या नव्या जबाबदारीमुळे गोयल यांचे संघटनेतील राजकीय वजन वाढण्याची शक्यता आहे.याशिवाय, केंद्रीय जल व स्वच्छता मंत्री एस.एस. अहुवालिया यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळातले फेरबदल हा स्मृती इराणींसाठी मोठा झटका आहे. कारण याआधीही त्यांच्याकडे असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयही काढून घेण्यात आले. आता त्यांच्याकडे माहिती प्रसारण खाते काढूनही इराणी या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.