Bharat Ratna: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने 'भारतरत्न' (Bharatratna) पुरस्कार देण्याचा नवा विक्रम केला आहे. गेल्या 15 दिवसांत पाच मोठ्या व्यक्तींना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये 2 माजी पंतप्रधान, 1 माजी उपपंतप्रधान, 1 मुख्यमंत्री तसेच प्रसिद्ध कृषी तज्ज्ञांचा समावेश आहे. यातील चौघांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. या पाच नावांची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांच्या भारतरत्नवर सोनिया गांधींची पहिली प्रतिक्रिया
केंद्र सरकारने आज देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao), माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh) आणि कृषीतज्ञ एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. यापूर्वी केंद्र सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishn Advani) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpuri Thakur) यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती.
1999 मध्ये अटल सरकारने 4 व्यक्तींना सन्मानित केलेविशेष म्हणजे, यापूर्वी एका वर्षात सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार 1999 मध्ये देण्यात आले होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 4 मोठ्या व्यक्तींना हे सन्मान प्रदान केले होते. आता मोदी सरकारने तो रेकॉर्ड मोडित काढत पाच व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारने भारतरत्न दिलेल्या व्यक्ती उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यातील आहेत. अशाप्रकारे सरकारने उत्तर ते दक्षिण भारत कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे.
कधी झाली भारतरत्नची सुरुवातभारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो राजकारण, कला, साहित्य, विज्ञान या क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवकाला दिला जातो. पण, 2013 मध्ये पहिल्यांदा खेळातील योगदानासाठी सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 1954 रोजी केली होती. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांना 1954 मध्ये पहिल्यांदा हा सन्मान प्रदान करण्यात आला.