न्यूयॉर्क : भाजपा नेता नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास त्यांचे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी त्रासदायक ठरेल व भाजपा सत्तेवर आल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते, असे मूळ भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांनी म्हटले आहे.
न्यूयॉर्क येथे सध्या सुरू असलेल्या पेन वर्ल्ड व्हॉईस फेस्टिव्हलमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चाललेल्या परिसंवादात मोदी यांनी हे मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात बोलताना रश्दी म्हणाले की, नरेंद्र मोदी सत्तेवर येतील या शक्यतेमुळे मी अत्यंत चिंतित आहे. आत्ता भाजपाकडे सत्ता नाही, तरीही पत्रकार व लेखकांना त्यांच्याकडून त्रास दिला जातो. मोदींचे समर्थक आताही सेन्सॉरशिप लावत असून, त्यांच्या समर्थकांचा कोप होऊ नये यासाठी लोक आताही त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी हे विघटनवादी असून कट्टरवाद्यांचे कट्टरवादी आहेत, असाही शेरा रश्दी यांनी मारला आहे. मोदी यांच्यासारखा पंतप्रधान भारतात कधीही सत्तेवर आलेला नाही, भाजपाला बहुमत मिळाल्यास मोदी सत्तेवर येतील अशी दाट शक्यता असून, पंतप्रधानपदामुळे मोदी यांच्यात काही बदल होतो काय हे पाहावे लागेल, असे रश्दी म्हणाले.
गेल्या महिन्यात रश्दी व शिल्पकार अनिश कपूर यांनी मोदी यांच्याविरोधात लिहिलेल्या खुल्या पत्रावर स्वाक्षरी केली होती. या पत्रावर अनेक लेखक, कलाकार व वकील यांनी स्वाक्षर्या केल्या होत्या. या पत्रानंतर भारतात सोशल मीडियावर हल्ले झाले, असा सलमान रश्दी यांचा आरोप आहे.