मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निश्चित; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 08:17 PM2021-07-06T20:17:46+5:302021-07-06T20:23:57+5:30
बहुप्रतिक्षित, बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला; उद्या दिल्लीत मोदींच्या मंत्रिमंडळाचा जंबो विस्तार
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नव्हता. सध्याच्या घडीला अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांचा प्रभार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर उद्या संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.
...म्हणून दिल्लीला आलोय; मंत्रिपदाची चर्चा असताना नारायण राणेंनी सांगितलं वेगळंच कारण
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात उद्या जवळपास २० नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल. यामध्ये तरुण खासदारांना अधिक प्राधान्य देण्यात येईल. भारताच्या इतिहासातील हे सर्वात तरुण कॅबिनेट असेल, असं वृत्त एनडीटीव्हीनं सरकारमधील सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. सरकारमधील मंत्र्यांचं सरासरी वय पाहता मोदी सरकारचं नवं कॅबिनेट इतिहासातलं सर्वात तरुण कॅबिनेट असेल. यामध्ये अधिक महिलांना संधी देण्यात येईल. प्रशासनाचा अनुभव असलेल्यांना या विस्तारात विशेष प्राधान्य देण्यात येईल, असं सुत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली
'नव्या कॅबिनेटमध्ये जवळपास दोन डझन मंत्री इतर मागासवर्गीय जातींमधील (ओबीसी) असतील. लहान जातींच्या प्रतिनिधींनादेखील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कॅबिनेटचं सरासरी शिक्षणदेखील अधिक असेल. नव्या चेहऱ्यांमध्ये पीएचडी, एमबीए, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांचा समावेश असेल. कॅबिनेट विस्तारात राज्य आणि प्रांतांकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे,' अशी माहिती सुत्रांनी दिली.
ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, पशुपती पारस, नारायण राणे, कपिल पाटील, वरुण गांधी यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे सर्व खासदार सध्या दिल्लीत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह काँग्रेसला रामराम केल्यानं मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आलं. तर सोनोवाल यांनी हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडलं. महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय तापला आहे. राणे मराठा समाजाचं, तर पाटील ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे या दोघांची निवड निश्चित मानली जात आहे.