नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे समर्थन केले आहे. अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यातंर्गत ताब्यात घेतल्यानंतर काही जण आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी फारुख अब्दुल्ला आणि जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी 'जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी जागा निर्माण करणे सरकारने थांबवावे आणि नेत्यांना सोडून द्यावे' असं ट्विट केलं आहे. तसेच 'सरकार फारुख अब्दुल्ला यांचं राजकीय स्थान संपवण्याचा प्रयत्न करत आहे, तसं झालं तर त्यांची जागा दहशतवादी घेतील. त्यानंतर मग काश्मीरचा वापर कायम भारताच्या इतर भागात राजकीय धृवीकरणासाठी केला जाईल' असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना पब्लिक सेफ्टी अॅक्ट (पीएसए) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, ज्या ठिकाणी फारुख अब्दुल्ला यांना ठेवण्यात येईल, त्याठिकाणी आदेशानुसार तात्पुरते घोषित करण्यात आले आहे. पीएसए कायद्यानुसार कोणत्याही संशयिताला कोणत्याही खटल्याशिवाय दोन वर्षे ताब्यात ठेवले जाऊ शकते. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
एमडीएमकेचे नेते आणि राज्यसभा खासदार वायको यांनी फारुख अब्दुल्ला यांची मुक्तता करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समोर आले. काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांचे हनन होत असून फारुख अब्दुल्ला यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले असल्याचे वायको यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात सांगितले. याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला एका आठवड्यात उत्तर देण्याची नोटीस पाठविली आहे. मात्र, केंद्र सरकारने नोटीसची आवश्यकता नसून पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे.
हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर देखील राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, भारतात हिंदीव्यतिरिक्त बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक भाषा हा दुबळेपणा नाही. तसेच अमित शहा यांच्या वक्तव्यावर द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, असदुद्दीन ओवेसी, कमल हासन आदींनी टीका केली होती.