ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - एनडीएचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी नरेंद्र मोदी हे एकानुवर्ती अध्यक्षीय सरकार चालवत असल्याची टीका केली आहे. ही दिशा देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात असलेल्या शौरींनी इंडिया टुडे या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अध्यक्षीय पद्धतीचं सरकार मोदी चालवत असून समतोल साधण्याची यंत्रणा नसल्याचा आरोप केला आहे.
मोदी सरकारची गेल्या दोन वर्षातली कामगिरी आपण नीट न्याहाळली असून येत्या तीन वर्षांमध्ये मानवी हक्कांवर गदा येण्याचा धोका असल्याचा इशारा शौरींनी दिला आहे. आपल्याला सोयीस्कर नसलेल्या मतांची गळचेपी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदी माणसांना पैपर नॅपकिन प्रमाणे वापरतात
इंदिरा गांधी व जयललिता यांचा दाखला देत त्यांच्याप्रमाणेच मोदी देखील आत्मकेंद्रीत असल्याचा टीका शौरींनी केली आहे. असुरक्षितता, स्वत:च्या प्रेमात गुंतून राहणे आणि सगळ्या घटनांमधून वैयक्तिक लाभ मिळवत राहणे ही मोदींची वैशिष्ट्ये असल्याचे शौरींनी म्हटले आहे. याआधीही शौरींनी मोदींवर शरसंधान केलं होतं. लोकांचा वापर करायचा आणि त्यांना बाजुला फेकून द्यायचं ही मोदींची कार्यशैली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मोदी माणसांना पेपर नॅपकिनप्रमाणे वापरतात, आणि त्याबद्दल त्यांना जराही खेद नसतो असेही शौरींनी म्हटले आहे.
शौरींना अर्थमंत्री केलं नाही म्हणून ते मोदींवर टीका करत असल्याचा आरोप अत्यंत चुकीचा असल्याचा दावाही शौरींनी केला आहे.
या मुलाखतीमध्ये अरूण शौरींनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेतील महत्त्वाचे मुद्दे:
- मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळा, ललित मोदी घोटाळा आणि पश्चिम बंगालमधील शारदा घोटाळा यामध्ये जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली नाही.
- मोदींची दोन वर्षे म्हणजे प्रत्येकाशी रोज खेळलेली बॉक्सिंगची मॅच होती. एक चांगली संधी पूर्णपणे फुकट घालवली.
- पाकिस्तानबाबत मोदी सरकारचं निश्चित असं धोरणच नाही. पाकिस्तानच्या नजरेत आपण मूर्ख ठरलो आहोत.
- गुड गव्हर्नन्स कुठे आहे? लष्करामध्ये नागरी व लष्करी संबंधांचा विचार केला, गुड गव्हर्नन्स दिसत नाही.
- मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार नाहीये हे मान्य, परंतु राज्यांमधला भ्रष्टाचार थोपवण्यास असमर्थ.
- कॉमनवेल्थ गेम्समधल्या घोटाळ्याचं काय झालं. कारवाई होतेय की थांबवण्यात आली.
- चीनच्या बाबतीत नेहरू व मोदी दोघांनाही वाटलं ते ड्रॅगनला भुरळ पाडतिल, परंतु दोघेही अपयशी ठरले.
- मोदी अगदी मोजक्या निवडक लोकांकडून सल्ला घेतात.
- अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात सत्य शोधण्यासाठी मोदी सरकारकडेदोन वर्षे होती, परंतु काही केलं नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर जे काही सांगत आहेत, त्यात नवीन काही नाही.