'मोदी सरकारने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं', राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:20 AM2021-02-17T07:20:53+5:302021-02-17T07:21:26+5:30
Rahul Gandhi : पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, “मोदी सरकार ने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं, बस ‘दो’ का विकास कराना हैं.”
माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून म्हटले की, “मोदी सरकारच्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत, तर गरीब जास्त गरीब होत आहेत, याचे पुरावे आहेत.” याच प्रकारे पेट्रोल व डिझेलच्या भावावरून केलेल्या ट्वीटमध्ये येचुरी यांनी आकडेवारीही दिली. त्यात म्हटले आहे की मे २०१४ मध्ये पेट्रोलचा आधार भाव ४७.१२ रुपये होता. केंद्राचा कर १०.३९ रुपये, डीलरचे कमिशन २ रुपये, राज्याचा कर ११.९ रुपये होता. तेव्हा पेट्रोल ७१.४१ रुपये लिटर विकले जायचे. फेब्रुवारी २०२१ मध्ये आधारभाव २९.३४ रुपये, केंद्राचा कर ३२.९८ रुपये, डीलरचे कमिशन ३.६९ रुपये, राज्याचा कर १९.९२ रुपये आणि पेट्रोलचा भाव ८६.३ रुपये झाला. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मोदी सरकार पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवून तिजोरी भरीत असल्याचा व हा पैसा कुठे खर्च केला जात आहे हे कोणालाच समजत नाही, असा आरोप केला.