नवी दिल्ली- भारतामध्ये उत्पादनक्षेत्र वाढीस लागावे आणि अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रातील 328 वस्तूंवरील आयातशुल्क दुपटीने वाढवले आहे. या संदर्भातील अधिसूचना केंद्रीय अर्थराज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लोकसभेत सादर केली आहे.1962च्या कायद्यानुसार वस्त्रोद्योग क्षेत्रातील 328 वस्तूंवरील आयातशुल्क 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात येत आहे असे त्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
सध्या या वस्तूंवर आयातशुल्क कमी असल्यामुळे भारतात तयार होत असलेल्या वस्तूंपेक्षा त्या वस्तू अत्यंत स्वस्त आहेत. त्यामुळे भारतीय उत्पादकांना असा दिलासा देणे गरजेचे होते. या निर्णयामुळे 10.5 कोटी लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जॅकेटस, सूटस आणि कारपेटवरती आयातशुल्क दुप्पट करुन ते 20 टक्क्यांवर नेले होते. जुलै महिन्यात 50 वस्तूंवर आयातशुल्क वाढवण्यात आले होते. देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले होते. रोजगार निर्मिती हे केंद्र सरकारसमोरिल मोठे आव्हान आहे. त्यामुळे नवे रोजगार तयार व्हावेत आणि भारतीय तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना हाती घेतल्या आहेत. त्यापैकीच आयातशुल्क वाढवणे हे एक पाऊल आहे.