नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्याचे सरकार सर्वच आंदोलनांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशात मोदी सरकारला पर्याय शोधण्याची विचार करणे आवश्यक असल्याचे मनमोहनसिंग यांनी म्हटले. या सरकारमध्ये शेतकरी आणि तरुण त्रस्त आहेत. तर दलित आणि अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स ऑफ ट्रुथ' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मनमोहनसिंग यांनी मोदींवर टीका केली. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांसमवेत डॉ. मनमोहनसिंग यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच यावेळी या पुस्तकाचे कौतूकही डॉ. सिंग यांच्याकडून करण्यात आले. हे पुस्तक म्हणजे मोदी सरकारचे समग्रु विश्लेषण आहे. सरकारचा नाकर्तेपणाचा आरसा म्हणजे हे पुस्तक आहे. मोदी सरकारने आपले वायदे पूर्ण केले नाहीत. या सरकारच्या राज्यात शेतकरी त्रस्त असून आंदोलन करत आहेत. तरुण वर्ग दोन कोटी नोकरींच्या शोधात आहेत. देशातील औद्योगिक उत्पादन आणि प्रगतीला खीळ बसली आहे. नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे उद्योग धंद्यांवर वाईट परिणाम झाल्याचेही सिंग यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.