नवी दिल्ली : कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कमी पडले आहे, अशी टीका या सरकारचे कट्टर समर्थक व अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात आणखीही महत्त्वाची कामे असतात, असा टोलाही अनुपम खेर यांनी मोदी सरकारला लगावला आहे.ते म्हणाले की, कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उभारण्यात या सरकारला अपयश आले. त्यामुळे याप्रकरणी होणारी टीका रास्त आहे. कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे होणारे हाल, त्यामुळे नातेवाइकांची होणारी घालमेल, कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून दिल्याचा उघडकीस आलेला प्रकार या घटनांनी देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर म्हणाले की, केवळ असंवेदनशील व्यक्तीच अशा घटनांनी हेलावणार नाही. कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून देणे ही घटना भीषण आहे. मात्र, इतर राजकीय पक्षांनी या घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणे हेदेखील अयोग्य आहे.
‘धर्मराज’ गजेंद्र चौहान यांचा मोदींना पाठिंबा- कोरोना रुग्णांवरील उपचारांत होत असलेली हेळसांड तसेच औषधे, ऑक्सिजन यांचा देशभरात निर्माण झालेला तुटवडा यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर खूप टीका होत आहे. मात्र, तरीही मोदी यांचे समर्थन करताना अभिनेते गजेंद्र चौहान यांनी म्हटले आहे की, गाय भलेही आपल्या मालकावर नाराज असेल; पण म्हणून काही ती कसायाच्या घरी जात नाही. - महाभारत मालिकेत गजेंद्र चौहान यांनी धर्मराजाची भूमिका केली होती.