ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - देशभरात राज्य घटना अंमलात आली तो दिवस अर्थात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला गेला असतानाच याच दिवशी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या जाहिरातींमध्ये संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे शब्द वगळल्याचे समोर आले.संविधानाच्या सरनाम्यामध्ये असे बदल करण्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. हा दिवस देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त सोमवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाने जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये संविधानातील सरनामा (प्रास्ताविक) छायाचित्र वापरण्यात आले होते. यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द वगळण्यात आले होते. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. याविषयी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड म्हणाले, आम्ही यामध्ये काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही फक्त संविधानाच्या पहिल्या प्रास्ताविकाचे सन्मान केला. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा १९७६ -७७ च्या काळात ४२ व्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत समावेश झाला. मग त्यापूर्वीचे सरकार धर्मनिरेपक्ष व समाजवादी नव्हते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी जाहिरात देताना चूक झाल्याचे खासगीत मान्य करताना दिसत होते.
काय आहे नेमका वाद ?
> संविधानातील मूळ प्रास्ताविकेमध्ये 'आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा...' अशी सुरुवात आहे.
> मोदी सरकारने २६ जानेवारी रोजी दिलेल्या जाहिरातीमध्ये 'आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य घडवण्याचा...' असा उल्लेख केला गेला आहे.