ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने सरकारने सर्व मंत्रालयांना 5-5 यशस्वी कामांची यादी तयार करण्यास सांगितले आहे.
भाजपा सत्तेत आल्यापासून काय बदल घडवून आणला आणि सामान्य नागरिकांना काय फायदा झाला हे संबंधित मंत्र्यांना सांगावं लागणार आहे. यासंबंधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सर्व मंत्रालयांना एक पत्र पाठवल्याचं वृत्त आहे. यामध्ये सर्व मंत्र्यांना आपल्या आपल्या मंत्रालयाच्या योजना आणि कामाची माहिती देण्यास सांगण्यात आल्याचं समजतंय. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.
मंत्र्यांना केलेल्या कामांची यादीच मंत्र्यांना सादर करावी लागणार आहे. सत्तेत आल्यानंतर केलेली कामे, जनतेला फायदा झाला असेल आणि लोकांनी कौतुक केले असेल अशी पाच यशस्वी कामे. मंत्रालयांनी मिळवलेले मोठे यश, मंत्रालयाची खास कामगिरी दाखवणारे काम, सुधारणांबाबत सूचना, मंत्रालयाच्या योजनांची पूर्ण माहिती. 2014 मध्ये काय स्थिती होती आणि 2017 मध्ये काय प्रगती झाली याचा लेखाजोखा मागवण्यात आला आहे. नायडू यांनी पाठवलेल्या पत्रात केवळ बुलेट फॉर्ममध्ये 3 पानांची नोट तयार करण्यास सांगितले आहे. सर्व मंत्रालयांच्या माहितीच्या आधारे एक डाटा बुकलेटही तयार केले जाईल आणि ते 26 मे पूर्वी प्रकाशित केले जाईल.
यापूर्वीही 21 मार्चला एका पत्रात व्यंकय्या नायडू यांनी मंत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांना सध्याच्या एनडीए सरकारने केलेल्या सकारात्मक बदलांबाबत माहिती देण्यास सांगितले होते.