नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर आता मोदी सरकार डिसेंबरमध्ये आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. डिसेंबरपासून सरकार एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहे. पेट्रोलियम कंपन्या आणि गॅस एजन्सीच्या संचालकांकडून याबद्दलचे संकेत मिळत आहेत. सरकार एलपीजी सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देण्याच्या निर्णयापर्यंत आलं आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल होतात. सध्याच्या घडीला मुंबईत १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ८९९.५० रुपये आहे. डिसेंबरमध्ये हाच दर २०० रुपयांनी कमी होऊ शकतो. शहरातील प्रमुख एजन्सी डिलर्सना प्रत्येक सिलिंडरमागे २०० रुपये सबसिडीचा मेसेज आला आहे. मात्र अद्याप तरी या संदर्भात कोणताही लेखी आदेश आलेला नाही. त्यामुळे निश्चितपणे काही सांगू शकत नाही, अशी माहिती डिलर्सनी दिली.
मे २०२० पासून सबसिडी बंदशहरात एचपी, भारत गॅसच्या एजन्सीस आहेत. याच एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळतात. एप्रिल २०२० पर्यंत स्वयंपाकाच्या गॅसवर सबसिडी मिळत होती. त्यावेळी सिलिंडरचा दर ७५० रुपयांपेक्षा कमी होता. सबसिडीमुळे सिलिंडर ६०० पेक्षा कमी रुपयांना मिळत होता. मात्र मे २०२० पासून सबसिडी बंद झाली. त्यातच सिलिंडरचे दरही वाढले. त्यामुळे ग्राहकांना दुहेरी फटका बसला. मात्र आता पुन्हा सबसिडी सुरू होण्याची शक्यता आहे.