जालोर : मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत देशातील जनतेवर प्रचंड अन्याय केला आहे. ‘अच्छे दिन आयेंगे'ची जागा आता ‘चौकीदार चोर है' या घोषणेने घेतली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केले. राजस्थानमधील मारवाड भागातल्या जालोर येथे प्रचारसभेत राहुल गांधी यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वांना समान न्यायाने वागविले जाईल. आताचे सरकार जो भेदभाव करीत आहे, तो आमचे सरकार संपवेल. कर्जफेड न केल्याबद्दल जर श्रीमंतांना तुरुंगात पाठविले जात नसेल तर शेतकऱ्यांनाही कर्ज न फेडल्याबद्दल तुरुंगात पाठवणे बंद केले पाहिजे.
सरकार श्रीमंतांना लाखो, करोडो रुपये देत असेल तर तितकेच पैसे शेतकऱ्यांनाही मिळाले पाहिजेत, अशी आमची भूमिका असून, नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयाद्वारे मोदी यांनी श्रमिक, लहान व्यापारी, गरीब यांचे पैसे छिनावून घेतले. आमचे सरकार आल्यास आम्ही जनतेच्या मनातील गोष्ट जाणून घेऊ व त्याप्रमाणे कारभार करू, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने जाहीर केलेल्या न्याय योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व रोजगाराच्या आणखी संधी निर्माण होतील. काँग्रेस सत्तेवर आल्यास एका वर्षात २२ लाख सरकारी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडेल. विधानसभा, संसदेत तसेच सरकारी नोकºयांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊ अशी आश्वासने राहुल गांधी यांनी या सभेत दिली.