नवी दिल्लीकेंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असून सरकारचा चर्चेचा प्रस्तावही फेटाळून लावला आहे. त्यात आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी उत्पन्न दुप्पट केलं हे खरं आहे. पण शेतकऱ्यांचं नव्हे, तर अदानी आणि अंबानी यांचं उत्पन्न दुप्पट केलं", अशी घणाघाती टीका राहुल यांनी केली आहे. यासोबतच जे लोक हे काळे कृषी कायदे कसे योग्य आहेत अशीच दवंडी पिटत आहेत ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काय तोडगा काढणार?, असं म्हणत राहुल यांनी सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावावर टीका केली आहे.
शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरुच'दिल्ली चलो' आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेले हजारो शेतकरी अजूनही सिंधू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत दिल्लीच्या सीमेवरच आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. जोवर सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील शेतकरी देखील दिल्लीत प्रवेश करण्यासाठी दिल्ली-गाजीपूर सीमेवर जमा झाले आहेत.