स्कूल चलें हम अभियानांतर्गत केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ब्रह्मकुंडी येथील सरकारी शाळेत पोहोचल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सावित्री ठाकूर स्वतः 12वी पास आहेत आणि यादरम्यान त्यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असं लिहायचं होतं, पण त्या नीट लिहू शकल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी 'बेढी पड़ाओ बच्चाव' असं लिहिलं. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काँग्रेसनेही या घटनेचा समाचार घेत खिल्ली उडवली. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात ही घटना घडली. शिक्षण जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' चा नारा लिहायचा होता. त्या लिहित असताना त्यांनी चुका केल्या. याचाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते केके मिश्रा यांनी या घटनेवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "याला देशाचं दुर्दैव समजायचं की लोकशाहीचा नाईलाज. देशाचं संविधान की आपलं शिक्षण धोरण यासाठी जबाबदार आहे" असं म्हटलं आहे. या टीकेनंतर भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे प्रवक्ते डॉ. हितेश बाजपेयी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. "काँग्रेसच्या राजवटीत आदिवासी मुली कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेऊ शकल्या याचा विचार करा! जे काही तुमच्या राहुल यांना करता आलं नाही, ते या गरीब आदिवासी कुटुंबातील मुलीने करून दाखवलं. इतकंच नाही तर बारावीपर्यंत कठीण आणि गरीब परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर त्या भाजपाच्या महिला बालविकास मंत्री झाल्या."
"त्यांच्यासारखं कठीण जीवन जगणाऱ्या सर्व मुलींना मदत करेन, अशी शपथ घेतली. तुम्ही आणि काँग्रेसने तर आदिवासी महिलांचा अपमान करण्याती शपथच घेतली आहे पंडितजी. हा देश आणि समाज तुमच्या गरीब आणि महिलाविरोधी मानसिकतेला कधीच माफ करणार नाही. आदिवासी कुटुंबात मुलगी म्हणून जन्माला आलात तरच हे समजेल" असं म्हटलं आहे.