मुंबई: बँकिंग व्यवस्थेबाहेर असलेल्या नागरिकांना या व्यवस्थेत सहभागी करुन घेण्यासाठी मोदी सरकारनं जन-धन योजना आणली होती. आता मोदी सरकारकडून नवं बँक खातं आणलं जाऊ शकतं. सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही बँकेत जाऊन हे नवं खातं सुरू करता येईल. या खात्यावर ग्राहकांना बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळेल. मात्र बचत खातं आणि या नव्या खात्यात एक मोठा फरक असेल. नीती आयोगानं अर्थ मंत्रालयाला गोल्ड सेविंग्स अकाऊंट व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर अर्थ मंत्रालय गंभीरपणे विचार करतं आहे. या नव्या खात्यात ग्राहक सामान्य खात्यासारखेच पैसे भरू शकतात. मात्र त्यांच्या पासबुकवर पैशांची एंट्री होणार नाही. या नव्या खात्यात पैशांऐवजी बँकेच्या पासबुकवर सोन्याची नोंद होईल. उदाहरणार्थ, 10 ग्रॅम सोन्याचं बाजारमूल्य 30 हजार असताना एखाद्या व्यक्तीनं त्याच्या खात्यात 15 हजार रुपये जमा केल्यास त्याच्या पासबुकमध्ये 5 ग्रॅम सोन्याची एंट्री होईल. विशेष म्हणजे या खात्यातून तुम्हाला पैसे आणि सोनं काढण्याचे पर्याय मिळू शकतात. नीती आयोगानं याबद्दलची माहिती अर्थ मंत्रालयाला दिलेल्या प्रस्तावात दिली आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात 30 हजार रुपयांचं सोनं असल्यास, तुम्ही बाजारभावानुसार तितक्या किमतीचं सोनं किंवा रोख रक्कम काढू शकता. मात्र त्यावेळी बँकेकडे तितकं सोनं उपलब्ध असायला हवं. अन्यथा बँक तुम्हाला रोख रक्कम देऊ शकते.
मोदी सरकार लवकरच तुमच्या पैशाचं 'सोनं' करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 12:34 PM