अहमदाबाद - गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आर्थिक आणि परराष्ट्र धोरणावरुन मोदी सरकारला खडेबोल सुनावले. आर्थिक आघाडीवर काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाशी बरोबरी करायची असल्यास पाचव्यावर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 10.6 टक्के असला पाहिजे. जर असे घडले तर आनंदच आहे पण मोदी सरकारला हे जमेल असे वाटत नाही अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली.
मोदी सरकारचे परराष्ट्रधोरण विसंगत असून त्यात सातत्य नसल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे नुकसान झाले आहे. मोदी सरकारने उचललेली काही पावले देशाच्या हिताची नाहीत असे मनमोहन म्हणाले. काँग्रेस प्रणीत संपुआच्या राजवटीत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्यावर कठोर कारवाई झाली. पण भाजपाच्या राज्यात हे होताना दिसत नाही असे सिंग म्हणाले.
मोदी म्हणतात ते नर्मदेचा मुद्दा माझ्याकडे घेऊन आले पण माझ्याशी ते या विषयावर बोलल्याचे मला आठवत नाही. मोदींनी भेटीची वेळ मागितल्यानंतर मी नेहमीच त्यांना भेटलो. पंतप्रधान म्हणून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची माझी जबाबदारी होती असे मनमोहन सिंग म्हणाले. मोदींचा नोटाबंदीचा निर्णयही फसला. नोटाबंदीचा मूळ उद्देश सफल होऊ शकला नाही. भ्रष्टाचार आजही सुरु आहे. नोटाबंदीशी संबंधित सर्व कागदपत्रे जनतेसमोर मांडली पाहिजेत असे सिंग म्हणाले.