नवी दिल्ली - केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. हे सरकार गेम चेंजर नव्हे तर नुसतेच नेम चेंजर आहे. हे सरकार यूपीए सरकारच्या काळातील योजनांचीच नावे बदलवून स्वत:चे कौतुक करवून घेत आहे, असा टोला त्यांनी लगावला. आपल्या भाषणात गुलाम नबी आझाद म्हणाले, " 1985 आणि त्यानंतर काँग्रेस आणि यूपीए सरकारच्या कार्यकाळात जेवढ्या जोयना आल्या त्यांचेच नाव बदलून त्या योजना नव्याने सुरू करण्यात येत आहे. तुम्ही प्रत्येक योजना सुरू करताना सांगता की आमचे सरकार गेम चेंजर आहे. मात्र तसे काही नसून, हे सरकार केवळ नेम चेंजर आहे."यावेळी आझाद यांनी विविध योजनांचा उल्लेख केला, "स्वच्छ भारत स्वच्छ भारत, जनधन योजना, स्किल इंडिया यांसारख्या अनेक योजना काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाल्या. आता केवळ त्यांचे नाव बदलण्यात आले आहे. मी आधीच सांगितले होते की, पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात जरी तुमचे सरकार उदघाटन करत राहिले तरी यूपीएच्या सगळ्या योजनांचे उदघाटन करू शकणार नाही, असे मी आधीच सांगितले होते आणि आज तेच घडत आहे."भाषणादरम्यान आझाद यांनी हल्लीच समोर आलेल्या 8 महिन्यांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेचा उल्लेख केला. जर सरकार असा नवा भारत घडवत असेल तर आम्हाला हा असा भारत नको आहे. आम्हाला आमचा जुना भारत परत द्या. सध्या सत्तेवर असलेले भाजपा सरकार हे गेल्या 70 वर्षांमधील सर्वात कमकुवत सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. हे सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करत आहे. सगळीकडे संशयाचे वातावरण आहे. या सरकारने जणू सगळ्या विरोधी पक्षांनाच दहशतवादी मानले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मोदी सरकार गेम चेंजर नाही, नुसतेच नेम चेंजर, काँग्रेसची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 8:32 PM