नवी दिल्ली : देशभरात ५00 आणि १000 रुपयांच्या बाद झालेल्या नोटांच्या बदल्यात बँकांतून १00 रुपयांच्या नोटा घेण्यासाठी झुंबड उडाली असताना, त्यात कोणीही राजकारणी वा मंत्री का दिसत नाही, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू असताना, शुक्रवारी अचानक काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी दिल्लीतील एका एटीएम केंद्राबाहेर रांगेत उभे राहिल्याने दिल्लीकरांना आश्चर्याचा धक्काच बसला.संसद मार्गावरील स्टेट बँकेसमोर सकाळपासूनच मोठी रांग लागली होती. पैसे बदलून मिळण्यासाठी तासन्तास जात असल्याने रांगेतील लोक कातावून गेले होते. निष्कारण त्यांच्यात वादावादी होत होती. त्याचवेळी अचानक त्या रांगेत राहुल गांधीही उभे राहिले. त्यांनाही नोटा बदलून घ्यायच्या होत्या. बँकेत प्रत्येकी चार हजार रुपये मिळतील, हे माहीत असूनही ते उभे होते. एरवी व्हीआयपी येताच, बाकीच्यांना दूर केले जाते, तसे इथे मात्र घडले नाही. एटीएममध्ये खडखडाट असल्याने लोकांना जो त्रास सहन करावा लागत असून, बँकांपुढेही प्रचंड रांगा लावाव्या लागत आहेत. अशा वेळी आपण लोकांसोबत आहोत, हा संदेश देण्यासाठी राहुल गांधी यांनी रांगेत उभे राहून दिला.देशभरातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी या जनतेसोबत आहे, असे असे राहुल गांधी म्हणाले. पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकेत भरून चार हजार रुपये घेण्यासाठी आपण इथे आल्याचे राहुल यांनी सांगितले.दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास तिथे आलेल्या राहुल गांधी यांनी त्यांचा क्रमांक लागल्यानंतरच बँकेतून नोटा बदलून घेतल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदी सरकार केवळ धनाढ्यांपुरतेच!
By admin | Published: November 12, 2016 2:36 AM