अयोध्या: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेनं कायदा करावा, असा अल्टिमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दिला आहे. सरकारनं संसदेत कायदा करुन राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करावा. शिवसेना संसदेत यासाठी सरकारच्या पाठिशी उभी राहील, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाहीत, असं म्हणत राम मंदिरासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहू नका, असं सूचक विधान त्यांनी केलं. अयोध्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. 'हिंदूंनी आणखी किती काळ राम मंदिराची वाट पाहायची. आता हिंदू मार खाणार नाही, असं अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. त्याचप्रमाणे आता हिंदू स्वस्थ बसणार नाही. मंदिर कधी उभारणार, हा प्रश्न तो विचारणारच,' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला ठणकावलं. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मी इथं आलोय, असंही ते म्हणाले.मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नहीं बताएंगे, याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलं. मला आज तारीख हवीय. बोला, कधी उभारताय राम मंदिर, असा सवाल त्यांनी केला. श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारनं न्यायालयाच्या निर्णयापूर्वी संसदेत राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा करावा. शिवसेना त्यावेळी संसदेत सरकारच्या बाजूनं उभी राहील, असं ठाकरे यांनी म्हटलं.