केंद्र सरकार ऐतिहासिक अशा राजपथाचे नाव बदलण्याची तयारी करत आहे. याचबरोबर सेंट्रल व्हिस्टा लॉनचे देखील नाव बदलण्यात येणार आहे. केंद्र सरकार या राजपथाचे नाव कर्तव्यपथ असे ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला कर्तव्यपथ असे नाव दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. राजपथाच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल, लॉन, ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असेल. इंडिया गेट ते मानसिंग रोडपर्यंतच्या उद्यान परिसरात खाण्याची परवानगी दिली जाणार नाहीय.
प्रकल्पाची गरज का भासली? सद्य:स्थितीतील संसद भवन तसेच विविध सरकारी खात्यांची कार्यालये, मंत्र्यांची दालने, मंत्रालय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांची निवासस्थाने हे सर्व अपुरे पडत आहे या सगळ्याचे बांधकाम १९२७ मध्ये एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर या ब्रिटिश स्थापत्यकारांनी केले आहे. त्यामुळे या परिसराला ल्युटेन्स दिल्ली असे संबोधले जाते काळानुरूप सध्याची बांधकामे जीर्ण आणि अपुरी आहेत. त्यामुळे नव्या संसद भवनासह संपूर्ण परिसराचे नव्याने बांधकाम करण्याचे ठरले ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली
नवीन काय? सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत सध्याचे नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक यांचे रूपांतर संग्रहालयात केले जाईल. उपराष्ट्रपतींचे सध्याचे निवासस्थान पाडले जाईल. नवीन संसद भवनात भव्य असा कॉन्स्टिट्यूशन हॉल (राज्यघटना सभागृह) उभारला जाईल. कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटनेची मूळ प्रत ठेवली जाईल. संसद भवनाच्या आवारात सर्व मंत्र्यांची नवीन कार्यालये असतील. पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींची निवासस्थाने असतील. काळाची गरज लक्षात घेऊन लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत ३८४ सदस्यांसाठी आसनव्यवस्था असेल. डिजिटली अद्ययावत असेल नवीन संसद भवन. नवीन संसद भवन भूकंपरोधक असेल.