ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १७ - भारतातून नरेंद्र मोदी सरकार हटवा, आम्हाला आणा मगच पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारतील असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. मणिशंकर यांच्या विधानाने आता वाद निर्माण झाला असून यामुळे काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी १० दिवसांपूर्वी पाकिस्तानी वृृत्तवाहिनी दुनिया टीव्हीवरील चर्चासत्रात सहभाग घेतला. या चर्चासत्रात मणिशंकर अय्यर, सुधींद्र कुलकर्णी आदी मंडळी उपस्थित होती. भारत - पाक संबंधांमध्ये सुधारणा कशी होईल असा सवाल चर्चासत्रात उपस्थित होताच अय्यर म्हणाले, यांना हटवा आणि आम्हाला आणा. यावर मुलाखतकर्त्याने 'हे काम तुम्हीदेखील करु शकता' असे सांगितले असता आम्ही मोदी सरकारला हटवणारच असे त्यांनी नमूद केले.पाकिस्तान हा लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या प्रचाराचा मुद्दा नव्हता, सबका साथ सबका विकास या भूमिकेमुळेच मोदी सरकार सत्तेवर आले असे अय्यर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारतात मनमोहन सिंग तर पाकमध्ये परवेझ मुशर्रफ यांच्यासारखे नेतृत्व गरजेचे आहे असा दावाही त्यांनी केला.
मोदी सरकारच्या पाक धोरणावर सुधींद्र कुलकर्णी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. 'मोदींना पाकसोबत चांगले संबंध हवेत, पण ते काही अटीशर्ती टाकत आहेत. यामुळे चर्चाच सुरु नाही झाली व हे चुकीचे आहे' असे कुलकर्णी यांनी सांगितले. यापूर्वी सलमान खुर्शीद यांनी पाकमध्ये जाऊन मोदी सरकारवर टीका केली होती तर नवाझ शरीफ यांचे कौतुक केले होते.