नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक उद्याच लोकसभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपाकडून सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून हे विधेयक उद्याच लोकसभेत मांडण्यात येईल. हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी सरकार अधिवेशनाचा कालावधी वाढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनंदेखील आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत उद्या लोकसभेत आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक मांडतील. हे विधेयक मंजूर व्हावं, यासाठी भाजपानं खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. तर काँग्रेसकडूनही सर्व खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्वणांना आरक्षण देण्यासाठी घटनेच्या दोन कलमांमध्ये दुरुस्ती आवश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हे विधेयक भाजपासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. लोकसभेत भाजपाला बहुमत असल्यानं विधेयकाचा मार्ग सुकर मानला जात आहे. मात्र राज्यसभेत भाजपाला बहुमत नाही. त्यामुळे राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपाची कसोटी लागेल. त्यातच उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर व्हावं, यासाठी मोदी सरकारकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेटनं एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याबद्दलचं विधेयक लगेचच दुसऱ्याच दिवशी लोकसभेत येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.