ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 20 - मुस्लिम समाज जर ट्रिपल तलाकची प्रथा बदलण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार यासंबंधी पाऊलं उचलण्याची शक्यता आहे व या प्रथेवर निर्बंध आणण्यासाठी कायदाही बनवण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले की, ""मुस्लिम समाजानं स्वतःहून ट्रिपल तलाकची प्रथा बदलावी. अन्यथा अशी परिस्थिती निर्माण होईल की सरकारला यासंबंधी निर्बंध आणण्यासाठी कायदा अंमलात आणावा लागेल. हे कोणत्याही खासगी प्रकरणात हस्तक्षेप करण्यासारखे नाही उलट महिलांच्या न्याय्यहक्कांचा प्रश्न आहे. सर्व महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. कायद्यासमोर सर्व समान, हा मुद्दा आहे.""
यावेळी व्यकंय्या असेही म्हणाले की, ""हिंदू समाजात बालविवाह, सती आणि हुंडा यांसारख्या वाईट प्रथांना संपुष्टात आणण्यासाठी कायदा अंमलात आणला गेला आहे"".
""हिंदू समाजानं बालविवाहवर चर्चा केली आणि यावर निर्बंध आणण्यासाठी संसदेत कायदा पारित करण्यात आला. दुसरी सती प्रथा ज्यात पतीच्या निधनानंतर पत्नीनंही पतीच्या अंतिमसंस्कारावेळी मृत्यूला कवटाळण्याची प्रथा कायद्याअंतर्गत बंद करण्यात आली. तिसरा प्रथा हुंडा, यासाठी कायदा पारित करण्यात आल्यानंतर हिंदू समाजानं तो स्वीकारला"", असेही व्यकंय्या नायडू यांनी यांनी यावेळी सांगितले.
""समाजविरोधी प्रथांसंदर्भात हिंदू समजानं चर्चा केली व त्यात सुधारणा आणली. आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहे. मनुष्याला मनुष्याच्या रुपात पाहा, धर्मांमध्ये त्यांचे विभाजन करू नका. याच भेदभावातून महिलांवरही अन्याय होऊ नये "", असेही ते म्हणालेत.