मोदी सरकार 'मेकिंग इंडिया' आणि कांग्रेस 'ब्रेकिंग इंडिया'साठी काम करतेय : शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 09:03 PM2018-09-08T21:03:31+5:302018-09-08T21:04:10+5:30
दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय समितीची बैठक सुरु आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'मेकिंग इंडिया'साठी झटत आहेत, तर विरोधी पक्षांसह काँग्रेस देश तोडायचे काम करत आहे. विरोधकांची महाआघाडी ही केवळ पोकळ वासा असल्याची टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.
दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय समितीची बैठक सुरु आहे. यावेळी शहा बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 2019 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 2014 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी यावेऴी व्यक्त केला. तसेच महाआघाडी ही खोट्यावर आधारित असणार आहे. याची सत्यता जनतेपर्यंत पोहोचविण्यात यावी. पी. चिंदंबरम यांच्याकडून ज्या अफवा पसरविण्यात येत आहेत, त्यास कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर द्यावे, अशा सुचनाही शहा यांनी केल्या.
तसेच घुसखोरांना भारतात स्थान नसून केवळ योग्य मार्गाने हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन यांसारख्या अफगानिस्तान, पाकिस्तान किंवा बांगलादेशमधून आलेल्या लोकांनी भारताकडे शरण देण्याची मागणी केल्यास त्यांना हात न आखडता मदत दिली पाहिजे. असा कायदा आम्ही बनविणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.